इतिहास

सन १८५७ रोजी मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखालील उठावाने ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध पहिल्यांदा सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली आणि आपल्या भारत वर्षाच्या स्वातंत्र्य समराची सुरवात झाली . ब्रिटिशांनी त्यांच्या विरुद्ध झालेला उठाव सैनिकांचे बंड म्हणून मोडीत काढला आणि क्रांतिकारकांची मुस्कटदाबी केली आणि तो उठाव मोडून काढला . या उठावाचे परिणाम हळू हळू देशात इतरत्र सर्वदूर दिसू लागले . १८५७ च्या उठावातून बाहेर पडलेले क्रांतीचे विचार , स्वातंत्र्याचे विचार सर्वदूर पसरत होते . आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेक लढवय्या मात्तबरांना या उठावाने प्रेरणा दिली . ज्यांच्या साम्रज्याचा सूर्य कधीच मावळणार नाही अशा अविर्भावात असणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याविरोधात देशाच्या अनेक भागात क्रांतीच्या मशाली हातात घेऊन अनेक नरवीर स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती देण्यासाठी एकवटत होते . १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी कमालीचे दडपशाहीचे धोरण अवलंबले होते . या दडपशाहीमुळे स्वातंत्र्याचे विचार सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे येत होते . काळ हळू हळू पुढे सरकत होता . काळाबरोबर स्वातंत्र्य क्रांतीचे विचार अधिकाधिक घट्ट होत होते . काळ येऊन थांबला १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात . १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून आणि मनात क्रांतीची ज्योत सातत्याने ज्वलंत ठेऊन इंग्रजांविरोधात दोन हात करण्यासाठी सुसज्ज असे एक अग्रगण्य व्यक्तिमत्व कार्यरत होत … ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे . श्रीमंत भाऊसाहेब रंगारी म्हणजे पुण्यातील एक प्रसिद्ध अग्रगण्य व्यक्तिमत्व. श्रीमंत भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांच पूर्ण नाव. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे राजवैद्य होते . राहत्या घरी त्यांचा धर्मार्थ दवाखाना होता . देशभरातून त्यांचेकडे उपचारासाठी पीडित रुग्ण येत असत .

भाऊसाहेब स्वतः अध्यात्मवादी विचारांचे होते . त्यांचा धार्मिक विषयांचादेखील गाढा अभ्यास होता . त्यांचा राहता वाडा म्हणजे शनिवार वाड्याचा पिछाडीचा भाग . त्याला शालूकरांचा बोळम्हणत . हा परिसर म्हणजे तत्कालीन शालूंची मोठी बाजारपेठ म्हंटल तरी कोणाची हरकत नसावी . या परिसरामध्ये शालू विणण्याचे आणि शालू रंगविण्याचे काम चालायचे . श्रीमंत भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता या त्यांच्या व्यवसायावरून त्यांना रंगारी हे आडनाव रूढ झाले . शालू रंगवता रंगवता भाऊसाहेबांनी आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्याचं स्वप्न सुद्धा रंगवलं.श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्यासारखा एकाचवेळी अध्यात्म , आयुर्वेद आणि क्रांतीकारी इत्यादी बहुविध विचारांचा अवलिया व्यक्तिमत्व असणारा माणूस या अंजन कांचन करवंदीच्या महाराष्ट्राच्या मातीत रुजत होता, आपल्या उरी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी धडपडत होता. ब्रिटिशांच्या तोडा - फोडा राज्य करा या दडपशाहीच्या धोरणात आपला समाज भरडला जातो आहे आणि स्वातंत्र्याच्या विचारापासून सर्वसामान्य माणूस दूर जात आहे हि बाब भाऊसाहेबांना अस्वस्थ करत होती . ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आपला जाती , धर्मामध्ये विभागलेला समाज एकत्र आला पाहिजे अशी समाजाला दिशा देणारी विचार धारणा भाऊसाहेबांची होती.

सन १८९२ च्या सुरवातीला भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशिनाथ उर्फ नानासाहेब खासगीवाले ग्वाल्हेरला गेले होते . तेथे त्यांनी तेथील संस्थानिक दरबारामध्ये सर्व प्रजेला बरोबर घेऊन गणेशोत्सव साजरा होत असताना त्यांनी बघितला व पुण्यात परत आल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी या विषयावर चर्चा केली . अगोदरच भाऊसाहेबांच्या मनात ब्रिटिश साम्राज्यविरोधात करावयाच्या कारवायांसंदर्भात खल सुरु होता अशा पूरक वातावरणात आपले स्नेही सरदार नानासाहेब खासगीवाले यांच्या सोबत झालेल्या चर्चेमधून भाऊसाहेबांना क्रांतीची वाट आणखी सुकर झाली आणि त्यांच्या मनामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मूर्त स्वरूप धारण करू लागली . आणि भाऊसाहेबांचा विचार पक्का झाला आणि भाऊसाहेबांनी आपल्या राहत्या वाड्यात आपल्या सहकाऱ्यांची एक बैठक बोलावली , या बैठकीस महर्षी अण्णासाहेब पटवर्धन , बाळासाहेब नातू , गणपतराव घोटावडेकर , लखूशेठ दंताळे , बळवंत नारायण सातव , खंडोबा तरवडे , मामा हसबनीस , दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पटवर्धन इत्यादी तत्कालीन मान्यवर व्यक्ती या बैठकीस उपस्थित होत्या . या बैठकीत भाऊसाहेब रंगारी यांचे नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली . सन १८९२ मध्ये भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एकूण तीन गणपती बसविण्यात आले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती , गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती , आणि नानासाहेब खासगीवाले यांचा गणपती , या तीन गणपतींची दहा दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतृदशी दिवशी मिरवणूक काढण्यात आली . या सार्वजनिक मिरवणुकीत काशिनाथ ठकूजी जाधव यांचा सवाद्य मेळाहि होता . अशा प्रकारे उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण समाज एकत्र करून समाजाला विधायक दिशा देण्याचं महत्वाचं राष्ट्रकार्य श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी यथोचित पार पाडलं .( महाराष्ट्र राज्यशासन - स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोष खंड ३ मध्ये भाऊ साहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात १८९२ मध्ये केली आहे असे नमूद करण्यात आलेले आहे. )

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या या नव्या अध्यायामुळे आपल्या वैभवशाली संस्कृतीच्या रांगड्या मातीत सार्वजनिक उत्सवाचं रोपटं रुजवण्यात भाऊसाहेबांना यश आलं . जाती पंथामध्ये अडकलेला समाज श्री गणेशाच्या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र आला आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधात एकत्रित समाजाची नवी ताकद जोमाने उभी राहिली. भक्तीचं शक्तीशी नातं सांगणाऱ्या आपल्या पवित्र मातीत क्रांतीचा ध्वज सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आसमंतात दौलाने फडकू लागला आणि केवळ पुण्यातच नव्हे तर या उत्सवामुळे देशभरातील स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली .पुढच्या वर्षी या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप वाढत गेले . क्रांतीचे लोकशिक्षण या उत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात भाऊसाहेब यशस्वी झाले होते सार्वजनिक उत्सवाचा हा नवा पायंडा श्रीयुत लोकमान्य टिळकांना खूप पसंत पडला आणि उत्सवासंदर्भात त्यांनी केसरी या आपल्या वृत्तपत्रामध्ये मंगळवार दि . २६/९/१८९३ रोजी स्फुट लेखन करून " यंदाच्या साली ज्या सद्गृहस्थाने हि खटपट केली त्याचे आपण आभार मानले पाहिजे " असे श्रीमंत भाऊसाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले . या उत्सवातून प्रेरित होऊन लोकमान्य टिळकांनी स्वतः सन १८९४ साली आपला गणपती सरदार विंचूरकर वाड्यात बसविला . समाजाच्या व देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला वेगळी दिशा देणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात अशा प्रकारे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी केली . यातूनच पुढे अनेक राजकीय आणि क्रांतिकारी चळवळी निर्माण होऊन त्याचा स्वातंत्र्यप्राप्तीसाठी उपयोग झाला .

भक्तीला शक्तीची जोड असा पराक्रमाचा वारसा असणाऱ्या शिवछत्रपतींच्या या मातीत श्रीमंत भाऊसाहेबांसारखं अस्सल कणखर बियाणं रुजलं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून क्रांतिकार्याच्या रूपानं अवघ्या भारतवर्षात बहरलं . त्या काळी स्वातंत्र्य चळवळीचे अधिष्ठान असणाऱ्या आणि क्रांतिकारकांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीपुढे अनेक समाजधुरंधर पुढाऱ्यांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारकांची भाषणे , व्याख्याने , प्रवचने व मेळे होत असत , यात प्रामुख्याने लोकमान्य टिळक , चाफेकर बंधू ,पंडित मदन मोहन मालवीय , बिपीनचंद्र पाल , सेनापती बापट , स्वातंत्र्यवीर सावरकर , सुभाषचंद्र बोस , हुतात्मा राजगुरू ,प्रो . शि . म . परांजपे , कृ . प . खाडिलकर , श्रीधर जिन्सीवाले , प्रो . श्रीधर विठ्ठल दाते , वासुदेवराव गांधी (वकील ), दादासाहेब खोपर्डे , बाळासाहेब पोतदार , नानासाहेब दंडवते (वकील ), प्रो . मौलिचंद्र शर्मा , आचार्य ध्रुव , रंगाचार्य रेड्डी , रामानंद सरस्वती , डॉ . हेडगेवार , का . र . वैंशपायन , प्र . के . अत्रे , ग. म. नलावडे , प्रा . पुणतांबेकर , केशवदत्त महाराज , योगानंद दंडास्वामी , ह . भ . प . सोनोपंत दांडेकर , सदाशिव शास्त्री काशीकर , श्री . बाबूशास्त्री गुळवणी , जयराम आचार्य , वि . प . भोपळे , विश्वासराव डावरे , य .द. खोले , जयवंतराव टिळक , नानासाहेब परुळेकर, आबासाहेब मुजुमदार , रावबहादूर बाबूराव ओंकार , वसंतराव पाटील , अप्पा कासार , रामभाऊ लोखंडे , शंकरराव मोटघरे , सादबा महादबा काटे , नारायणराव गुंजाळ इत्यादी तसेच अनेक ज्ञात अज्ञात मंडळी देखील येऊन गेली आहेत .

सन १८५७


१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून आणि मनात क्रांतीची ज्योत सातत्याने ज्वलंत ठेऊन इंग्रजांविरोधात दोन हात करण्यासाठी सुसज्ज असे एक अग्रगण्य व्यक्तिमत्व कार्यरत होत ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे.

सन १८६७


सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ज्या वास्तूत रोवली गेली आणि हिंदुस्थानाच्या सामाजिक जीवनात लोकचळवळीचा नवा अध्याय ज्या वास्तूच्या साक्षीने रचला गेला ती वास्तू म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा राहता वाडा. क्रांतिकारकांचे माहेरघर असणारी हि वास्तू म्हणजे भारतीय वास्तू कलेचा उत्तम नमूना.

सन १८९४


दारूवाला पूल इथे झालेल्या हिंदू - मुस्लिम दंगलीत भाऊसाहेबांची कामगिरी अत्यंत महत्वाची. हिंदू आणि मुस्लिम समाजात एकोपा राहावा, संपूर्ण समाज एकसंध राहावा यासाठी भाऊसाहेबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

सन १८९२


सार्वजनिक गणेशोत्सवात लोक जागृतीची महत्वाची भूमिका बजावणारा लोकसंस्कृतीचे प्रतीक म्हणजे मेळा होय. १८९२ साली स्थापन झालेल्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवात मेळ्यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरली.

सन १८९३


१८९२ साली भाऊसाहेब रंगारी यांनी सुरवात केलेल्या सार्वजनिक गणेत्सवाचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांचे प्ररणेने पुण्यात पुढच्या वर्षी म्हणजे १८९३ साली गणपतीची संख्या वाढली आणि याची दखल लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्राद्वारे घेऊन दि. २६ सप्टेंबर १८९३ च्या केसरीच्या अंकात या उपक्रमाचे कौतुक केले.

सन १९०५


सार्वजनिक गणेशोत्सवाला आपले सर्वस्व अपर्ण केल्या नंतर भाऊसाहेबांनी आपली शेवटी इच्छा व्यक्त केली आहे की... “सार्वजनिक श्री गणपतीचा उत्सव आमचे नावाने करावा."

सन १९२४


श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा वैचारिक आणि क्रांतिकार्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे मानसपुत्र म्हणजे वैद्य काशीनाथ ठकूजी जाधव.

सन १९४१


क्रांतीकारी चळवळीचा साक्षीदार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या गौरवशाली महासंग्रामातील महान क्रांतीवीर डॉ. राम भोसले.

सन १९५८


श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी पुढे आपल्या गणपतीची कायमस्वरूपी व्यवस्था लावून श्री काशिनाथ बुवा यांना विश्वस्त म्हणून नेमले. आणि त्यांनी आपल्या अखेरपर्यंत हि जबाबदारी पार पडली सण १० एप्रिल १९५८ साली वयाच्या ९५ व्या वर्षी या गणेशउत्सवासाठी झिजणाऱ्या सच्या कार्यकत्यांचं निधन झालं.

---- स्वातंत्र-नंतर ----

Copyright © 2022 All rights reserved
:::| powered by dimakh consultants |:::

[Best viewed in IE 10+, Firefox, Chrome, Safari, Opera.]

लाईव्ह दर्शन